Swagat Samachar News

हिंगोली येथे ‘महासंस्कृती महोत्सव २०२४चे थाटात उद्घाटन

हिंगोली येथे ‘महासंस्कृती महोत्सव २०२४चे थाटात उद्घाटन

 

जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, 

हिंगोली दि.२२: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील रामलीला मैदानावर आज सायंकाळी ‘महासंस्कृती महोत्सव२०२४चे उद्घाटन आमदार संतोष बांगर, आणि आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य‌ कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे व्यासपीठावर उपस्थित होते. 

महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकधारा यांच्यासह भारुड, पोवाडा आदीसह, कुस्ती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पुढील पाचही दिवस विविध सुप्रसिद्ध कलाकार आणि स्थानिक कलाकार आपल्या कलांचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रास्ताविकातून केले. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीव्दय देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून या‌ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून, जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील पाच दिवसांतील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी उपस्थितांना केले.  

तसेच आमदार तानाजी मुटकुळे यांनीही आपल्या भाषणातून राज्याला कला व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभल्याचे सांगून रुढी परंपरा, सण उत्सव महोत्सवातून आपला महाराष्ट्र सामाजिक, वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद देत आस्वाद घेण्याचे आवाहन केले. 

 

पुढील पाचही दिवस नागरिकांना रामलीला मैदान येथे दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दररोज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण हिंगोलीकरांना पाहायला मिळणार आहे.   

राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात -अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  

    या महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे.

 आज गुरुवारी उद्घाटनाच्या दिवशी हिंगोली येथील प्रथितयश स्थानिक कलावंतांनी त्यांच्या कलांचे सादरीकरण केले. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व चमू गोंधळी, देविदास वाकुडे व चमू वासुदेव, मधुकर निवृत्ती इंचेकर व चमू शाहिरी व हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी हे हसवेगिरी ही कला सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. सायंकाळी प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तूत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा या कार्यक्रमात गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर करत प्रारंभ केला. 

 

 हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी आज सायंकाळी ५ वाजता आपल्या कला सादर केल्या. यावेळी आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते स्थानिक कलावंतांचा सत्कार करण्यात आला. 

आज होणारे कार्यक्रम

, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य, सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चिस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा सादर करणार आहेत. प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत सदाबहार संगीत रजनी सादर करण्यात येईल. यामध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नृत्य सादर करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र, झीटीव्ही सारेगमप विजेती गायिका अमृता नातू, मराठवाडा युवारत्न सन्मानित रॉकस्टार गायक स्वराज सरकटे हे राहणार आहेत. यामध्ये 32 कलावंताद्वारे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. नामवंत विनोदी कलावंत रामेश्वर भालेराव व कलीम पटेल यांचा कॉमेडियन शो रसिकांचे मनोरंजन करणार आहे. 

  याबरोबरच दि. 22 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

     कार्यक्रम सर्वांसाठी खुला

पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *