बुधवारपासून तीन दिवस रामलीला मैदानावर ‘जाणता राजा’चे आयोजन
महानाट्याच्या प्रयोगाला उपस्थित राहून लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर येत्या बुधवारपासून तीन दिवस बाबासाहेब पुरंदरे लिखीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे .
या कार्यक्रमांना दिनांक 2 जून, 2023 पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, निती, चरित्र, विचारांची व कार्यकुशलतेची महत्ती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारसा जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचावा, या उद्देशाने विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून येथील रामलीला मैदानावर दि. 14, 15 व 16 फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याव्दारे जिल्ह्यांमधील जनमाणसांपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन बुधवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पूणे निर्मित, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित /दिग्दर्शित आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महानाट्य “जाणता राजा” हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. या महानाट्याचा पहिला प्रयोग दिनांक 14 एप्रिल, 1985 रोजी पुणे येथे सादर झाला. गेली 38 वर्ष सदर महानाट्याचे सातत्याने सादरीकरण सुरु असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.
महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रासह देशातील कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये मराठी व हिंदी भाषेत सादरीकरण केलेले आहे. हे महानाट्य सातासमुद्रापार पोहचले असून, इंग्लंड व अमेरिका येथेही जाणता राजाचे प्रयोग झाले आहेत. आतापर्यंत या महानाट्याचे 1250 पेक्षा जास्त प्रयोग झाले असून, जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहून गौरविले आहे. तब्बल 150 कलाकार या महानाट्याचे सादरीकरण करतात, तसेच सदर महानाट्यात यादव काळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत प्रसंग असून यामध्ये रोमहर्षक चित्तथरारक लढाया तसेच विविध लोक नृत्यांचे प्रकार सादर केले आहे. म्हणजेच गोंधळ, वाघ्या मुरळी, कोळी, कव्वाली, लावणी असे विविध प्रकार यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे नेत्रदीपक शिवराज्याभिषेक व समयोचित आतषबाजीही आहे, प्रकाश व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, कपडे पट व भव्य फिरता रंगमंच यामधून शिवकाळच उभा राहतो. जाणता राजा हे महानाट्य फक्त कला अविष्कार नसून ते संस्कारक्षम आहे.
पार्कींग व्यवस्था
जाणता राजा या महानाट्य पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्कींग व्यवस्था शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आली आहे.
प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था
जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग पाहण्यासाठी पास घेऊन येणाऱ्या नागरिकांना प्रथम येणारास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी जाणता राजाचे प्रयोग पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी लवकरात लवकर पोहचण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
मैदानावर 8200 प्रेक्षकाची आसनव्यवस्था
जाणता राजा या महानाट्यासाठी 8200 प्रेक्षकांची आसन व्यवस्था असून त्यामध्ये 200 व्ही व्ही आय पी, 2000 व्हीआयपी आणि 6000 जनरल अशी व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक व्यवस्थेसाठी वेगवेगळे प्रवेशव्दार असणार आहेत, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.