माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन
हिंगोली- काँग्रेस पक्षाच्या माजी मंत्री रजनीताई सातव यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी आज 18 फेब्रुवारी रविवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.श्रीमती सातव यांना सकाळी श्वासनाचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांचा जन्म १३ जुलै १९४९ रोजी झाला होता.१९८० मध्ये त्या प्रथम कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी चार वेळा विविध मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या काम केले. त्यांच्याकडे आरोग्य, महसूल, आदिवासी विकास, समाज कल्याण ही राज्यमंत्र्यांची खाती त्यांच्याकडे होती. दोन वेळा त्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. हिंगोली जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालय व शाळा उघडून ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षणाची दारे खुली केली. स्व.खा. राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या विद्यमान आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्या त्या सासू आहेत.
.